ऐन पोळा सनाच्या दिवशी एक सहा वर्षीय निरागस बालकाचा नाल्याच्या पुरातील प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू

ऐन पोळा सनाच्या दिवशी एक सहा वर्षीय निरागस बालकाचा नाल्याच्या पुरातील प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू


भामरागड, २२ ऑगस्ट : तालुक्यातून ऐन पोळा
सणाच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोयर गावातील ६ वर्षीय रिशान प्रकाश पुंगाटी हा शासकीय आश्रमशाळेतील सुट्टीनिमित्त घरी आला होता. मात्र, गावालगतच्या नाल्याजवळ खेळताना तो वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिशान हा लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिल्या इयत्तेत शिकत होता. पोळा सणासाठी त्याचे वडील प्रकाश पुंगाटी यांनी त्याला गावी आणले होते. २१ ऑगस्ट रोजी दुपारी रिशान गावालगतच्या नाल्याजवळ खेळायला गेला. बराच वेळ तो घरी परत न आल्याने गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवली, पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी महसूल प्रशासन आणि गावकऱ्यांनी पुन्हा शोध घेतला असता, रिशानचा मृतदेह नाल्यात आढळला. सध्या मोकापंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा फटका

गडचिरोली जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत. भामरागड तालुक्यातील ही चौथी दुर्घटना आहे. यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी खंडी नाला ओलांडताना १९ वर्षीय लालचंद कपिलसाय लकडा आणि जोनावाही गावातील शिक्षक असन्तु सोमा तलांडी हे सिपनपल्ली नाल्यात वाहून गेले होते. नाल्यांवर पूल नसल्याने स्थानिक आदिवासींना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, याबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्याची अवस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अशा घटना घडत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. पूल आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. रिशानच्या मृतदेहाला नाल्यातून बाहेर काढताना गावकऱ्यांना तुडुंब भरलेल्या नाल्यातून वाट काढावी लागली, हे या समस्येचे गांभीर्य दर्शवते.

या घटनेने भामरागड तालुक्यातील पूरस्थिती आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Popular posts from this blog

प्रियांका कुंदोजवार आष्टी यांचे मृत्यूचे गुढ वाढले पतीस अटक तर सात जणावर गुन्हा दाखल

काटली येथील चार निरागस मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक व चालकास गडचिरोली पोलीसांनी शोधून काढलेच

दोन लहान सानुल्यांना पोरके करून माता पोहचली देवाघरी, बेडरूममध्ये घेतला गळफास आष्टी येथील घटना