गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी वारंवार कारवाई करा - पोलीस अधीक्षक निलोत्पल
गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी वारंवार कारवाई करा – पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे निर्देश
मुक्तिपथ व पोलीस विभागाची आढावा बैठक
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्री व तंबाखूबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस विभाग व ‘मुक्तिपथ’ अभियानाच्या समन्वयातून २१ ऑगस्ट रोजी महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील सकारात्मक बदलांचा आढावा घेऊन, उर्वरित भागांत वारंवार कारवाई करून अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निलोप्तल यांनी दिले.
गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात दुपारी ४ वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत पार पडली. या बैठकीस मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, दारूबंदी पथक प्रमुख अरुण फेगडे, तालुकास्तरीय पोलीस निरीक्षक तसेच मुक्तिपथचे तालुका संघटक उपस्थित होते. सिरोंचा व भामरागड उपविभागीय अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले.
बैठकीत मुक्तिपथ व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचा उल्लेख करण्यात आला. गडचिरोली शहरात वारंवार कारवाईमुळे अवैध दारू विक्री कमी झाली असून, वडसा तालुक्यातील माता वार्डात गेल्या तीन महिन्यांपासून अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद झाली आहे. संबंधित महिलेने दारूचा व्यवसाय सोडून भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केल्याची माहिती समाधानकारक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
उर्वरित गावांमध्ये जिथे अजूनही अवैध विक्री सुरू आहे, तिथे नियोजनबद्ध व वारंवार कारवाई करण्याचे तसेच कारवाईपूर्वी लोकजागृती करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले. युवकांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करावे, तसेच मोठ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई व तडीपारीसारखे कठोर उपाय अवलंबावेत, असेही त्यांनी सांगितले.